Headlines :
Featured Post Today
print this page
Latest Post
Showing posts with label विज्ञान/तंत्रज्ञान. Show all posts
Showing posts with label विज्ञान/तंत्रज्ञान. Show all posts

डॉ. जयंत नारळीकर

डॉ. जयंत नारळीकर
शास्त्रज्ञ
आकाशातले तारे मराठी घराघरांमध्ये पोहचवणारे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना राज्यातील सर्वोच्च असा ' महाराष्ट्र भूषण पुरस्कार ' जाहीर झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी या पुरस्काराची घोषणा केली. पाच लाख रुपये रोख , मानपत्र आणि मानचिन्ह , असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. नारळीकरांचे संपूर्ण नाव जयंत विष्णू नारळीकर. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. गणिताचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्याचे वडील, विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणित तज्ञ होते. वाराणशी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख होते. डॉ. नारळीकरांचं संस्कृतवरही प्रभुत्व आहे. तो वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या.
डॉ. नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणशी येथे झाले. तेथूनच सन १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रीज विद्यापीठात गेले. तेथे त्यांना बी.ए. एम.ए. आणि पी.एचडी.च्या पदव्या मिळाल्या. त्या काळात त्यांना रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
त्यांनी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एचडी. केली. सर फ्रेड हॉईल डॉ. नारळीकरांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाले. त्यामुळे १९६६ जेव्हा हॉईड यांनी केंब्रीज येथे `इन्स्टिटय़ूट ऑफ थिऑरॉटीकल ऍस्ट्रॉनॉमी' नावाची जी स्वत:ची संस्था सुरू केली, त्यात डॉ. नारळीकरांचाही महत्त्वाचा वाटा होता. १९६६ ते १९७२पर्यंत ते या संस्थेशी निगडीत होते. सर हॉईल आणि डॉ. नारळीकर यांनी खगोल शास्त्रात एकत्र संशोधन केलं. गुरुत्वाकर्षणावर त्या दोघांनी मिळून संशोधन करून जो सिद्धांत मांडला, तो `हॉईल-नारळीकर सिद्धांत' या नावाने खगोलशास्त्रात प्रसिद्ध आहे. अर्ल्बर्ट आईन्स्टाईनच्या साक्षेपतेच्या सिद्धांताशी साधर्म्य साधणारा असा हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत असे सांगतो की, वस्तूमधील कणाचे अंतर्गत वस्तुमान हे त्या वस्तूतील सर्व कणांच्या एकत्रित कार्याची परिणती असते.
दरम्यान डॉ. नारळीकरांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिराव राजवाडे यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लिलावती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवल्यानंतर भारतातील खगोल शास्त्रातील संशोधनाला आणि लोकप्रियतेला गती देण्यासाठी १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून पद स्वीकारले. कालांतराने १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्त झाली.
डॉ. नारळीकर शास्त्रज्ञ म्हणून ख्यातनाम तर आहेतच, पण त्याच बरोबर मराठी साहित्यात त्यांनी फार मोलाची भर घातली. विज्ञानकथांना त्यांनी मराठीत चालना देण्याचं महत्त्वाचं काम केलं. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी अनेक लेख आणि कथा लिहिल्या. यासाठी सर्व प्रसार माध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या `यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
त्यांनी लिहिलेल्या `वामन परत आला', `अंतराळातील भस्मासुर', `कृष्णमेघ', `प्रेषित', `व्हायरस', `यक्षाची देणगी', `टाईम मशीनची किमया', `याला जीवन ऐसे नाव' हे कथासंग्रह अत्यंत लोकप्रिय ठरले. शिवाय `आकाशाशी जडले नाते', `विमानाची गरुडझेप', `गणितातील गमतीजमती', `विश्वाची रचना', `विज्ञानाचे रचयिते', `नभात हसरे तारे' ही विज्ञानातील माहितीपर पुस्तके म्हणजे मराठीतला जपून ठेवावा आणि नेहमी काढून वाचावा असा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
मराठीच नव्हे, तर भारतातील सर्व भाषांतील गणित आणि विज्ञानातील पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम काटेकोरपणे रचण्याचे कामही ते करीत आहेत.
त्यांच्या महान कार्याची दखल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली. त्यामुळे त्यांना अनेक मान-सन्मान प्राप्त झाले. १९६५ साली त्यांना पद्मभूषण तर २००४ साली पद्मविभूषणने सन्मानीत करण्यात आले. शिवाय डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक, एम.पी. बिरला सन्मान आणि फ्रेंच ऍस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेन्सनसारखे सन्मानही त्यांना प्राप्त झाले. लंडनच्या रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते सहाधिकारी आहेत, तर इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस चे ते अधिछात्र आहेत. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीच्या इंदिरा गांधी पारितोषिकानेही त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे. वैज्ञानिक विषयांत साहित्यिक लिखाण करून विज्ञानाचा प्रसार करण्यासाठीही त्यांना १९९६ साली युनेस्कोने कलिंग पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
आजही पुण्यातील `आयुका'च्या माध्यमाने ते संशोधन कार्यात मठ आहेत. आज चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात संशोधन सुरू आहे.
0 comments

भारतीय शास्त्रज्ञ

शास्त्रज्ञ
१ अश्विनीकुमार पौराणिक भारतीय वैद्य
२ आघारकर शंकर पांडुरंग (१८८४- १९६०) भारतातील रूक्ष भागात उगवणार्‍या वनस्पतींचा स्वप्रचार व त्यांचे मूलस्थान या विषयावर संशोधन.
३ आर्यभट्ट पहिला (४७६ च्या सुमारास) हा पहिला प्रसिध्द भारतीय गणिती व खगोल शास्त्रज्ञ असून पृथ्वी रोज स्वत:भोवती फिरते हा शोध लावला.
४ आर्यभट्ट दुसरा (५८०) नंतर भारतीय गणिती व खगोल शास्त्रज्ञ असून संख्या दाखवण्यासाठी पाटी गणितात संज्ञा योजल्या असून, इतर बाकी दर्शवणार्‍या अक्षर संज्ञा आहेत असे यानी ग्रंथात नमूद केले आहे.
५ बसू प्रमथनाथ (१८५५- १९३४) भारतीय भूगर्भशास्त्रज्ञ असून वनस्पतीशास्त्रमध्ये शोध लावले.
६ बसू राज चंद्र (१९०१) प्रसिध्द स्विस गणिती ऑइलर याच्या गणितपध्दतीतील चुका यांनी दाखवून दिल्या.
७ बसू सत्येंद्र नाथ (१८९४- १९७४) स्टॅटिकची उत्पत्ती हे महत्त्वाचे संशोधन यानी केले.
८ बसू जगदीश चंद्र (१८५८- १९३७) विद्यूत चुंबकीय तरंगाचा,डायमेटि्न्कल कॉन्ट्रॅक्शन व रेझोनंट रेकॉर्डर ही दोन उपकरणे शोधून काढली.
९ ब्रम्हागुप्त (५९८- ६६५) आर्यभट्टांच्या उणीवांची दुरूस्ती करून दशमान पध्दतीने संख्यालेखन,बेरीज,व वजाबाकी त्वरीत होण्यास मदत झाली.
१० ब्रम्हाचारी उपेंद्रनाथ (१८७५- १९४६) युरिया अँटिमनी कंपाउंड शोधून काढून काळा आजार या रोगावरील उपचारात क्रांती घडवली.
११ भटनागर शांतिस्वरूप (१८९४- १९५५) भारतीय रसायन संशोधन असून कलिल रसायनामधील इमल्शनवरील व प्रकाशाचे जंतुवरील परिणामांचे संशोधन. तसेच अणूशास्त्रावरील संशोधन.
१२ भाभा होमी जहांगीर (३०/१०/१९०९- २४/१/१९६६) भारतीय गणिती व पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ आहेत. १९४५ व १९६६ या काळात भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जीचे प्रमुख होते.
१३ भारती कृष्णतीर्थ (३/१८८४- २/२/१९६०) वैदिक गणितसूत्रांचा त्यांनी विशेष अभ्यास केला.
१४ भास्कराचार्य १११४) भारतीय ज्योतिष शास्त्रज्ञ असून सिध्दांत शिरोमणी हा त्यांचा ग्रंथ महत्त्वाचा मानला जातो.
१५ चरक दुसरे शतक) भारतीय वैद्यक शास्त्रज्ञ.
१६ चंद्रशेखर सुब्रम्हण्यम (१९/८/१९१०) भारतीय पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ असून खगोलीय पदार्थ विज्ञान हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.
१७ चंद्रात्रेय मोहिनीराज (४/१२/१८९२- १३/३/१९६९) संख्यांचे गुणधर्म व त्यासंबंधीचे नियम ह्या विषयावर महत्त्वाचे संशोधन.
१८ छत्रे केरो लक्ष्मण (१८२४- १८८४) भारतीय गणित शास्त्रज्ञ असून ज्योतिष, गणित, सृष्टीशास्त्र या तीन ही विषयावर महत्त्वाचे संशोधन.
१९ चिंतामणी रघुनाथाचार्य (१८२८- १८७९) भारतीय खगोल शास्त्रज्ञ असून मद्रासच्या वेधशाळेत तयार झालेल्या तारास्थिती पत्रकातील बरेच तारे यांनी शोधून काढले आहेत.
२० दप्तरी केशव लक्ष्मण (२२/११/१८८०- १९/२/१९५६) भारतीय गणिततज्ञ व संशोधक.
२१ दासगुप्ता सतीशचंद्र (१४/६/१८८०- २४/१२/१९८०) भारतीय ग्रामीण शास्त्रज्ञ असून गॅस प्लँटची योजना त्यांनी प्रत्यक्षात आणून ग्रामीण विज्ञानाचा पाया घातला.
२२ दीक्षित चिंतामणी (१७३६- १८११) भारतीय ज्योतिष शास्त्रज्ञ असून सूर्यसिध्दांताची सारणी याने तयार केली.
२३ दीक्षित शंकर बाळकृष्ण (२०/७/१८५३- २७/४/१८९८) भारतीय ज्योतिष शास्त्रज्ञ, मोडकांच्या सहाय्याने सायनवादी पंचांग प्रसिध्द केले.
२४ दिनकर (१९ वे शतक) भारतीय ज्योतिष शास्त्रज्ञ.
२५ द्विवेदी सुधारक (१८६०- १९१०) भारतीय ज्योतिष शास्त्रज्ञ.
२६ धन्वंतरी भारतीय पौराणिक वैद्य. भारतीय आयुर्वेदाचा प्रवर्तक.
२७ धार नीलरतन (१८९६) भारतीय रसायन शास्त्रज्ञ असून प्रकाश-रासायनिक क्रियांचा तापगुणक कमी असल्याचे यांनीच प्रथम सांगितले.
२८ फाळके धुडिंराज (१८७०- १६/२/१९४४) भारतीय पहिला चित्रपट तयार करणारे निर्माते होते.
२९ गज्जर त्रिभुवनदास (१८६३- १९२०) भारतीय रसायन शास्त्रज्ञ असून त्यांचा जन्म सुरत येथे झाला. मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिक्षण झाल्यावर कराचीच्या सिंध कॉलेजमध्ये व नंतर बडोदा येथे कॉलेजात रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाचे काम पत्करले. बडोदास यांनी छापखान्याची व रंगकामाची प्रयोगशाळा काढली. त्यांनी प्लेगवर आयोडिन टरक्लोराइड नावाचे औषध शोधून काढले. १८९९साली टेक्नोकेमिकल लॅबोरेटरी स्थापन केली. खर्‍या मोत्यांचे तेज कायम टिकते म्हणून त्यांनी रासयनिक प्रक्रिया शोधली, त्यामुळे त्यांना मोठी किर्ती मिळांली.
३० गणपत कृष्णाजी (१८९०) भारतीय मुद्रण शास्त्रज्ञ असून मराठी टंकमुद्रणाच्या आरंभाचे श्रेय यांना दिले जाते. यांनी प्रथम लाकडी यंत्र तयार केले. शिशाचे तुकडे जमवले. अक्षरांचे उठाव पाहिले. निरनिरराळया प्रकारच्या शाईचे रंग पाहिले. लोखंडी प्रेस
३१ गणेश दैवज्ञ (१४९८- १५७८) भारतीय ज्योतिष शास्त्रज्ञ असून आकाशातील तारकांचे वेध यांनी घेतले आहेत.
३२ घाटगे विष्णू माधव (२४/१०/१९०८) यांनी भारतीय विमान विद्येत आधुनिक काळात मोठे काम केले आहे.
३३ गोखले शंकर लक्ष्मण (१/१२/१८६९- ५/८/१९६२) व्होल्टेजचे त्वरित मापन करण्यासाठी पोटेप्टिऑमीटर तयार केले. स्फेरिकल हार्मॉनिक्स या उच्च गणितावरील विषयावर संशोधन केले.
३४ गोडबोले कृष्णशास्त्री (१८३१-१८८६) भारतीय ज्योतिष शास्त्रज्ञ.
३५ गोडबोले नरसिंह (२८/१२/१८८८-३/१२/१९८४) भारतीय रसायन शास्त्रज्ञ असून सेमी लार्ज स्केल मॅन्युफॅक्चरिंग च्या बद्दल प्रयत्न करून नाव मिळवले.
३६ गोपाल अय्यंगार (१/१/१९०९) वनस्पती शास्त्रज्ञ आहेत. पेशीशास्त्र, क्रॅन्सर विकरण हे त्यांच्या संशोधनाचे विषय हाते.
३७ गोपालाचारलू पंडित डी. प्लेगवरील हेमादिपानक हा औषधी कल्प यांनी काढला.
३८ गोवारीकर वसंत (२५/३/१९३३) अंतराळ संशोधनात भारताला मानाचे स्थान मिळवून दिले.
३९ गोविंदस्वरूप दंडगोलाकार दुर्बीण तयार करून यांनी जगातील एक विक्रम नोंदवला
४० जयसिंह कच्छवाह (१६६९-१७३३) भारतीय खगोल शास्त्रज्ञ असून वेधकुशल, गणित-तज्ञ, ज्योतिष-तज्ञ व संशोधक होता.
४१ जीवक सहावे शतक भारतीय वैद्यक शास्त्रज्ञ असून त्याने विविध वनस्पतीचे गुण शोधून काढले.
४२ जीवराम कालीदासशास्त्री (१८८१) भारतीय वैद्यक शास्त्रज्ञ
४३ जोशी नारायण विष्णू (१८८५) भारतीय जंतुशास्त्रज्ञ व संशोधक.
४४ जोशी श्रीधर (१६/१०/१८९८-२४/७/१९८४) भारतीय रसायन शास्त्रज्ञ असून प्रकाशाच्या पदार्थाच्या अणुमात्रावर होणार्‍या क्रियेसंबंधी शोध न्यू लाइट इफेक्ट ह्या नावाने प्रसिध्द असून तो जोशी इफेक्ट ह्या नावाने ओळखला जातो.
४५ कृष्णन के. एस. (४/१२/१८९८- १३/६/१९६१) पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ.
४६ केशव दैवेज्ञ (१५ वे शतक) ज्योतिष शास्त्रज्ञ.
४७ कोकटनूर वामन रामचंद्र (१८८६) कलोरिन व कॉस्टिक सोडा यांच्या उपयोगासंबंधीचे विशेष संशोधन केले.
0 comments

भविष्यातील वाहतूक समस्या

विज्ञान लेख - अभियांत्रिकी
वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामूळे भारतातल्या सर्व मोठ्या शहरांत जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे.
परदेशात याउलट परिस्थिती आढळते. उत्तम रस्ते, सुस्थितीतील अत्याधुनिक वाहने व नियमाची कांटेकोर अंमलबजावणी यामुळे तेथील प्रवास जलद आणि सुरक्षित होणे सहज शक्य होते. अर्थात परदेशात लोकसंख्या भारताच्या मानाने खूप कमी आहे. ते देश सधन असल्याने त्यांना रस्ते बांधणी व त्यांची योग्य निगा राखणे जमू शकते.
आपल्याकडे पायी चालणारे लोक तसेच ठेले व बैलगाडीसारख्या हळू चालणाऱ्या वाहनांपासून ते जलद धावणाऱ्या मोटार सायकल, जीप, मोटारी व टृक टृॅक्टरसारखी अवजड वाहने एकाच रस्त्याचा वापर करीत असतात साहजिकच वाहतूक व्यवस्था प्रभावी होऊ शकत नाही. त्यातच वाहने थांबविण्याच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्रमणे व फेरीवाले यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड होते. साहजिकच शहरात राहणाऱ्या लोकांना वाहतूक समस्येचा फार त्रास होतो. शिवाय प्रदूषणामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. तरीही नोकरी धंद्यासाठी शहरातील वाहतुकीचा हा त्रास सहन करण्याशिवाय त्यांच्यापुढे गत्यंतर रहात नाही.
माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे या बिकट समस्येवर अगदी वेगळया प्रकारचा अभिनव उपाय सापडेल अशी आशा निर्माण झाली आहे. माणूस प्रवास कशासाठी करतो. नोकरीधंद्यानिमित्त ऑफिस वा दुकानात जाण्यासाठी, शिक्षण, वैद्यकीय उपचार अशांसारख्या सुविधा घेण्यासाठी, बाजारहाट करण्यासाठी, इतर व्यक्तींना भेटण्यासाठी वा प्रत्यक्ष वास्तू , परिस्थिती वा निसर्ग पाहण्यासाठी. या व अशाप्रकारच्या सर्व कामांसाठी भविष्यात प्रत्यक्ष प्रवास करण्याची जरूर भासणार नाही. घरबसल्या या सर्व गोष्टी संगणकाच्या माध्यमातून आपल्याला साध्य करता येतील.
यातील बऱ्याचशा गोष्टी परदेशात तसेच आपल्या देशातही यशस्वीरीत्या राबविण्यास सुरवात झाली आहे. मोबाईल, फोन व इंटरनेटच्या साहाय्याने जगातील कोणत्याही संपर्क साधता येऊ लागला आहे व माहितीची देवाण घेवाणही करणे सहज शक्य झाले आहे. परदेशात अनेक ठिकाणी घरबसल्या ऑफिसचे काम करण्याची सुविधा कंपन्यांनी आपल्या कर्मचारी वर्गाला देऊ केली आहे. वेगवेगळया गावात राहणाऱ्या व्यक्ती आता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे एकत्र चर्चा करू शकतात. वेबसाईटच्या माध्यमातून दुकानदार आपल्या वस्तू जगभरातील गरजू ग्राहकांना दाखवू शकतो. अशा अनेक वेब दुकानांतून फेरफटका मारून आपण क्रेडीट कार्डद्वारे पैसे देऊ न आपल्या पसंतीची खरेदी करू शकतो.
भविष्यात शिक्षणासाठी शाळा, कॉलेजमध्ये जावे लागणार नाही. संगणकावरच दूरस्थ शिक्षण देणाऱ्या मान्यतापात्र संस्थांतर्फे हे सर्व शिक्षण आपल्याला मिळेल. प्रत्यक्ष उपचार, इंजेक्शन वा ऑपरेशन वगळता बाकी सर्व वैद्यकीय सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून घेता येईल. औषधेही घरपोच मिळतील.
लग्न ठरविणे, घर पाहणे, कारखाना, प्रत्यक्ष प्रक्रीया वा कार्यक्रम पाहणे, भेट देणे या सर्व गोष्टी इंटरनेटच्या साहाय्याने करता येतील. केवळ करमणूक म्हणून वा सहलीसाठी लोक प्रवास करतील. अर्थात वस्तूंची निर्मिती करणे, प्रक्रिया करणे त्याची वाहतूक करणे, संरक्षण वा ज्याठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते अशा व्यवसायातील व्यक्तींना प्रवास टाळता येणार नाही.
भारतात इंटरनेटचा प्रसार वेगाने होत आहे. इंटरनेटच्या सुविधांसाठी लागणाऱ्या खर्चातही झपाट्याने घट होत आहे व सर्व सामान्यांच्या आवाक्यात हे प्रभावी माध्यम नजिकच्या भविष्यकाळात येईल. असे झाले तर बऱ्याच लोकांना मोठ्या शहरात वा परदेशात जाऊन राहण्याची गरज पडणार नाही. आपल्या देशात संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची कमतरता नाही. गरज आहे ती त्याच्या योग्य व्यवस्थापनाची व दूरदृष्टीची. अशा संगणक तंत्रज्ञांनी इंटरनेट व वेबसाईटचा कल्पकतेने वापर केला व सर्व लोकांनी या तंत्रज्ञानानाचा डोळसपणे स्वीकार केला तर एरव्ही अशक्य वाटणाऱ्या वाहतुकीसारख्या समस्या सहजपणे सुटतील. लोक शिक्षणाद्वारे अशी संगणक क्रांती करून भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करणे हा ज्ञानदीप एज्युकेशन अॅण्ड रिसर्च फौंडेशनचा उद्देश आहे.
भविष्यात असे खरोखरीच घडले तर काय होईल? रस्त्यांचा वापर प्रामुख्याने फक्त वस्तूंची वाहतूक करण्यासाठीच होईल. लोक आपल्या घरात, खेडेगावात, शेतात राहून सर्व कामे करू शकतील. घरातील लोकांना परस्परांशी बोलायला तसेच जीवन खऱ्या अर्थाने जगायला वेळ मिळेल. पाळणाघरे, वृद्धाश्रम यांची गरज राहणार नाही. मग मोठी शहरे व रस्ते ओस पडतील. पेटृोल डिझेलच्या किंमती खाली येतील. प्रदूषण थांबेल व खऱ्या अर्थाने भारतात नंदनवन अवतरेल. परदेशांतील आपले मौलीक बुद्धीवंतांचे धन भारतात परत येईल व त्या आधारे भारतात राहूनच आपण साऱ्या जगातील उद्योग धंदे व व्यवहार करू शकू.
- डॉ. सु. वि. रानडे
0 comments
 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2011. HINDU HERALD - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger